नवी दिल्ली : इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहिर झाला आहे. मानवाधिकार आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात आला. मागील वर्षी युक्रेन, बेलारूस आणि रशियामधील मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. यापूर्वीच्या विजेत्यांमध्ये नेल्सन मंडेला, बराक ओबामा, मिखाईल गोर्बाचेव्ह, आंग सान सू आणि संयुक्त राष्ट्र यांचा समावेश आहे.
नोबेल पुरस्कार स्टॉकहोममध्ये निवडले जातात. मात्र संस्थापक आल्फ्रेड नोबेल यांनी शांतता पुरस्काराची निवड ओस्लो येथील पाच सदस्यीय नॉर्वेजियन नोबेल समितीद्वारे जाहीर करण्याचे आदेश दिले. स्वतंत्र पॅनेल नॉर्वेजियन संसदेद्वारे नियुक्त केले जाते. यावर्षी समितीला 351 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 259 व्यक्ती आणि 92 संस्थांचे अर्ज होते.
शांतता पुरस्कार हा यावर्षी जाहीर झालेला पाचवा पुरस्कार आहे. गुरुवारी नोबेल समितीने नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर केला. बुधवारी रसायनशास्त्राचा पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ मौंगी बावेंडी, लुईस ब्रुस आणि अलेक्सी एकिमोव्ह यांना तर मंगळवारी भौतिकशास्त्राचा पुरस्कार फ्रेंच-स्वीडिश शास्त्रज्ञांना जाहीर झाला. हंगेरियन-अमेरिकन कॅटालिन कारिको आणि अमेरिकन ड्रू वेसमन यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.