कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांपासून एप्रिलमध्ये गुळाचा हंगाम संपल्यानंतरही पुढील चार महिने बाजार समितीत बिगर हंगामी गुळाची आवक सुरू असते. यंदाही अशी आवक मर्यादित असली तरी पंधरा दिवसांपासून गुळाचे दर ३६०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणात स्थिर आहेत. बाजारात गुळाला गुजरातमधून फारशी मागणी नाही. व्यापारी गुळाची गरज लागेल तितकीच खरेदी करत आहेत अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात गुऱ्हाळांमधूनच एक दिवसाआड गुळाची ४० ते ५० गाड्या आवक बाजार समितीत होत आहे. केवळ एक तासात गुळाचा सौदा संपतो. सध्या गुजरातमध्ये व महाराष्ट्रात कोणताही सण नसल्याने गुळाच्या मागणीत वाढ झालेली नाही. गुजरातमधील व्यापाऱ्यांना कर्नाटकातूनही गुळाची उपलब्धता होत आहे. हा गूळ कोल्हापूरपेक्षा काहीसा स्वस्त मिळत असल्याने व्यापाऱ्यांनी कर्नाटकच्या गुळाला प्राधान्य दिले आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीत दरही फारसे वाढले नसल्याचे चित्र आहे.