नवी दिल्ली : पावसाने निम्म्या देशभरात अक्षरशः तांडव सुरू ठेवले आहे. आसाममध्ये पाऊस आणि पुराने परिस्थिती अतिशय बिकट केली. तर कर्नाटकमध्येही लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशीच स्थिती उत्तराखंड, बिहार, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्राची आहे. येथे पाऊस आणि पुराची आपत्ती लोकांवर कोसळली आहे. फक्त गुजरातच नव्हे तर पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत लोकांना पावसामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्र असो वा कर्नाटक, सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर्षी मान्सून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
टाइम्स नाऊ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला असून रस्त्यांचे रुपांतर समुद्रात झाले आहे. गुजरातच्या चार भागांना मोठा फटका बसला आहे. यात छोटा उदयपूर, अहमदाबाद, नर्मदा आणि वलसाडचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये स्थिती चिंताजनक आहे. अगुम्बे घाटात मोठे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे शिवमोग्गा आणि उडूपीदरम्यानची वाहतूक बंद झाली. चिकमंगळुरमध्येही पाऊस सुरू असून मुदिगेरेमध्ये भूस्खलनात दुकाने, घरांचे नुकसान झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत १२५ जनावरांचाही मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार पावसामुळे ८०० पेक्षा अधिक घरे कोसळली असून ४ हजार लोकांना फटका बसला आहे. अशीच स्थिती राजस्थान आणि तेलंगणामध्ये आहे.