हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, ता. 14 : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. गेल्या पाच वर्षांत ‘एफआरपी’साठी एकही आंदोलन झाले नाही, ही त्याची पोचपावती आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते आज कागल येथील कारखाना कार्यालय परिसरात एका कार्यक्रमातझाले. त्यानंतर जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते.
श्री. फडणवीस म्हणाले, की ज्यावेळी मोदींचे सरकार सत्तेत आले, त्यावेळी विरोधकांनी साखर उद्योगावरून खिल्ली उडवली. यांना उसातील आणि साखरेतील काय कळते, असे विरोधक म्हणायचे. यांच्या काळात साखर कारखानदारीचे काय होणार आहे, असेही ते म्हणत होते. यांनी साखर कारखाना पाहिलेला नाही, काढलेला नाही अशी टीकाही विरोधकांनी केली. पण, आज एक गोष्ट अभिमानाने सांगतो, ऊस आणि साखर कारखाना याबाबतीत गेल्या पाच वर्षांत जे निर्णय घेण्यात आले ते यापूर्वी कधीही झालेले नाहीत. त्यामुळे अडचणीत असलेली साखर कारखानदारी पुन्हा उभी राहिली. अशी आशाही व्यक्त केली. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते.