शाहजहांपूर : शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाप्रश्नी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी मकसूदापुर साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे. अनेक वेळा सूचना देवूनही मकसूदापुर साखर कारखान्याने हजारो शेतकऱ्यांची ऊस बिले थकविली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी ऊस बिलासाठी साखर कारखान्यासह जिल्हा प्रशासनाकडे वारंवार चकरा मारल्या आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांना उसाची बिले मिळालेली नाहीत. मकसूदापूर साखर कारखान्याने एकूण ४२९६१ शेतकऱ्यांना केवळ ३३ टक्के रक्कम अदा केली आहे. उर्वरित रक्कम देण्यास कारखान्याकडून टाळाटाळ केली जात आहे.
ऊस बिल न मिळाल्याने नाराज शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. तरीही साखर कारखाना आणि प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्रा यांनी मकसूदापुर साखर कारखान्याला नोटीस पाठवून तातडीने बिले अदा करण्याचे आदेश दिले आहेत.