बिजनौर : बिलाई, चांदपूर, बिजनोरसह चार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नसल्याने ऊस विभागाने त्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसमोर ऊस बिलांच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ऊस विभागाने कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात खरेदी केलेल्या उसाचे सर्व पैसे दिले आहेत. इतर कारखान्यांनीही मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९४.६ टक्के बिले दिली आहेत. मात्र, बिलाई साखर कारखान्याने सर्वाधिक पैसे थकवले आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बिजनोर, चांदपूर आणि नजीबाबाद सहकारी कारखान्याकडे थकबाकी आहे. चारही कारखान्यांनी एकूण २३,७०८.२६ लाख रुपये थकवले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर लोकप्रतिनिधींनी थकबाकीचा मुद्दा मांडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकर पैसे देण्याविषयी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ऊस विभागाने कारखान्यांना नोटिसा दिल्या आहेत. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले की, थकबाकीदार कारखान्यांना नोटिसा दिल्या आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी ९४ टक्के ऊस बिले दिली असून उर्वरीत बिले लवकरच दिली जातील.