पंचकुला : रायपुररानी येथे स्थापन करण्यात येत असलेला इथेनॉल प्लांट पाचटापासून (पिकांचे शिल्लक अवशेष) चालवला जाणार आहे. प्लांटमध्ये ७ मेगावॅट प्रती तास विज निर्मिती केली जाईल. त्यासाठी इंधन म्हणून अंबाला आणि पंचकुलातील शेतकऱ्यांकडून पाचट खरेदी केले जाईल. पाचटापासून विज निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाचटाची विल्हेवाट लावण्यासह पर्यावरणाचे प्रदूषणही रोखले जाईल. दरवर्षी पिकांच्या कापणीनंतर पर्यावरणातील प्रदूषणाचा स्तर वाढल्यानंतर केंद्र सरकार ते राज्य सरकार अशा सर्व स्तरावर हालचाली गतिमान होतात. त्यावर उपाय योजनेचे दावे केले जातात. तरीही पाचट जाळण्याने होणारे प्रदूषण उच्च स्तरावर असते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पंचकुला येथील उद्योजक हरदीप सिंह चिमा यांनी पाचटापासून विज उत्पादन करण्यासाठी जवळपास २० वर्षे संशोधन केले आहे. त्यानंतर पाच वर्षांमध्ये ५० कोटी रुपये खर्चून १०० फूट उंच बॉयलर तयार करण्यात आला आहे. या बॉयलरमध्ये वार्षिक दीड लाख टन पाचट वापरले जाईल. हरदीप सिंह चीमा यांनी सांगितले की, येथे पाचटापासून प्रती तास ७ मेगावॅट विज निर्मिती होईल. बॉयलरमध्ये कोळशाऐवजी विज निर्मितीसाठी पाचट वापरले जाईल. चिमा यांनी तयार केलेले बॉयलर युरोप, आफ्रिका, साउथ ईस्टमधील देशांतही वापरले जातात.
इथेनॉल प्लांटबाबत उद्योजक कैलाश चंद मित्तल आणि लोकेश मित्तल यांनी सांगितले की, रायपुररानीमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन केला जात आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा प्लांट सुरू होईल. प्लांटसाठी पंचकुला आणि अंबालामधून पाचट खरेदी केले जाईल. यासाठी पाच ठिकाणी केंद्रे स्थापन केली आहेत. उसाच्या पाल्याचाही वापर यासाठी केला जाणार आहे, असे कैलाश मित्तल यांनी सांगितले. शून्य प्रदूषण तंत्राने विज निर्मिती केली जाणार आहे. दररोज दोन लाख १५ हजार लिटर इथेनॉल उत्पादन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.