ग्वाल्हेर : ज्वारीच्या नवीन वाणापासून इथेनॉल उत्पादन केले जाणार आहे. हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाऊ शकते. यातून वायू प्रदूषणाला आळा बसेल आणि देशावरील पेट्रोल आयातीचा भार काहीसा कमी होईल. राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठाअंतर्गत इंदूर कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी याविषयीचे संशोधन केले आहे.
‘नवी दुनिया’ वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ज्वारीपासून अशा प्रकारचे उच्च जैविक पदार्थ तयार केले गेले आहेत, ज्यापासून इथेनॉल तयार केले जाते. या जातीला सीएसव्ही ५४ एचबी असे नाव देण्यात आले आहे. या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. इथेनॉल जादा दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न चौपटीने वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्वारी सुधारणा प्रकल्पांतर्गत नव्या प्रजाती विकसित करण्यात आल्याची माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. उषा सक्सेना यांनी दिली. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने भरड धान्य उत्पादनाला प्रोत्साहन दिले. २०१६ मध्ये ज्वारी सुधार प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत आरव्हीजे १८६२ या वाणाची निर्मिती करण्यात आली. या ज्वारीचे उत्पादन हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल आहे. चाऱ्याची उत्पादकता १३० क्विंटल आहे. २०२३ मध्ये आरव्हीजे २३५७ या नव्या वाणाची निर्मिती केली आहे. यामध्ये धान्य आणि चारा दोन्ही मोठ्या प्रमाणात तयार होतो. सीएसव्ही ५४ एचबी या वाणाची निर्मितीही यंदा झाली आहे.