शिमला : ऊस आणि धान्यानंतर आता बटाट्यापासूनही इथेनॉल तयार होणार आहे. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था (सीपीआरआय, शिमला) बटाट्यापासून बायो इथेनॉल तयार करण्यासाठी बटाट्याच्या नवीन जाती विकसित करणार आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांच्या सूचनेनुसार ‘सीपीआरआय’च्या शास्त्रज्ञांनी 2025 पर्यंत इथेनॉल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, हे लक्ष्य गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता ऊस आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांसोबत बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फायदा मिळू शकतो.
‘सीपीआरआय’च्या क्रॉप फिजियोलॉजिकल बायोकेमिस्ट्री आणि पोस्ट-हार्वेस्ट टेक्नॉलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र कुमार आणि त्यांचे सहकारी डॉ. धर्मेंद्र कुमार यांनी बायो इथेनॉल बनविण्यास सक्षम असलेल्या बटाट्याच्या जाती ओळखून बायो इथेनॉल तयार केले आहे. सीपीआरआय नवीन बटाटा वाण विकसित करत नाही तोपर्यंत खराब बटाट्यापासून इथेनॉल तयार केले जाईल. देशातील एकूण बटाटा उत्पादनापैकी सुमारे 15 टक्के बटाटा विविध कारणांमुळे खराब होतो. त्यामुळे पहिल्यांदा खराब झालेला आणि अतिरिक्त उत्पादित बटाटे इथेनॉल उत्पादनासाठी वापरले जातील. सीपीआरआयचे संचालक डॉ.ब्रजेश सिंग यांनी सांगितले की, बटाट्यापासून इथेनॉल तयार करण्यासाठी संस्थेत घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
आगामी वर्षात इथेनॉल उत्पादनात ६०० कोटी लिटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता
ऊस, अन्नधान्य याच्या माध्यमातून इथेनॉल उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकार ने पाठबळ दिले आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. यासाठी ९९० कोटी लिटर वार्षिक पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार ने कंबर कसली आहे. केंद्राने मक्यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याने साखर व धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीत पुढील वर्षात, नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत ६०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात हे उत्पादन ३८० कोटी लिटरपर्यंत झाले आहे.क्रिसिल रेटिंग या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने हा अंदाज वर्तवला आहे.
२०२१ पासून केंद्राच्या प्रोत्साहनाने प्रत्येक वर्षी इथेनॉल मिश्रणात वाढ झाली. यंदा साखर उद्योगातील अनेक संस्थांनी पुढील हंगामाच्या प्रारंभापर्यंत गरजेपेक्षा जास्त साखर शिल्लक राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.गेल्या वर्षी पाऊस नसल्याने मक्यासह अन्य धान्याच्या उत्पादकतेवर परिणाम झाला, यामुळे धान्यावर आधारित इथेनॉल निर्मिती होऊ शकली नाही. तर दुसरीकडे कमी साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने इथेनॉलकडे वळविण्यात येणाऱ्या साखरेवर ही निर्बंध घालण्यात आले. या दोन्ही घटकांचा मोठा फटका इथेनॉल निर्मितीला बसला. याचा प्रतिकूल परिणाम इथेनॉल तयार करण्यावर झाला होता. यंदा ४० लाख टनांपर्यंत पर्यंत साखर इथेनॉलसाठी वापरण्यात येऊ शकते असा अंदाज आहे.