चंदीगढ : पंजाब आणि हरियाणा या राज्यांदरम्यान नवा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही राज्ये पाचट (धान्याचे अवशेष) जाळणे आणि त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत सामने-सामने आली आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान आरोप – प्रत्यारोपांनंतर आता कृषीमंत्र्यांनी वाद सुरू ठेवला आहे. पंजाबचे कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये वाढत्या प्रदूषणासाठी हरियाणाला जबाबदार धरले आहे. याला प्रत्युत्तर देत हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी पाचट जाळल्याची आकडेवारी सादर केली आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हरियाणाचे मंत्री जे. पी. दलाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सांगितले की, अरविंद केजरीवाल प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उलत नाहीत. आणि आपले अपयश केंद्र व हरियाणा सरकारवर टाकत आहेत. हरियाणामध्ये पंजाबच्या तुलनेत पाचट जाळण्याच्या घटना दहा पटींनी कमी आहेत. पंजाबमध्ये असे प्रकार १८ टक्क्यांनी वाढल्याचे ते म्हणाले. हरियाणात अशा घटनांमध्ये ३१ टक्के घट झाली आहे. तर पंजाबमध्ये असे प्रकार वाढले आहेत. पंजाबमध्ये २४ हजार १४६ ठिकाणी पाचट जाळले गेले आहे. यातून हरियाणाचे वातावरणही खराब होत आहे.