कानपूर : साखर उद्योगात आता मुलींनाही करिअरची संधी मिळू लागली आहे. काही वर्षांपूर्वी ही थोडी कठीण बाब होती. कानपूरमधील नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने साखर उद्योगाच्या सहकार्याने हा बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेचे संचालक प्रोफेसर नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, विशेषत: प्रक्रिया व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापन, दस्तऐवजीकरण आणि मशिनरी डिझायनिंगमधील अनेक कामे मुलींकडून कार्यक्षमतेने पार पाडली जाऊ शकतात, अशी हमी आम्ही शुगर युनिट्सना दिली आहे. दुसरीकडे, विद्यार्थिनींना साखर उद्योगात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल आम्ही एक मोहीम राबवली आहे.
संस्थेने या गोष्टीसाठी कठोर परिश्रम घेतले आणि त्यातून हळूहळू विद्यार्थिनींनी संस्थेने दिलेले विविध अभ्यासक्रम आणि नोकरीच्या संधींबद्दल विचारणा सुरू केली आहे. या शैक्षणिक वर्षात संस्थेतील विविध अभ्यासक्रमांमध्ये विक्रमी २२ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत, असे प्रभारी शिक्षण अधिकारी अशोक गर्ग यांनी सांगितले. आता आमच्याकडे बहुतांश मुली रिसर्च स्कॉलर आहेत. त्या संस्थेने सुरू केलेल्या विविध संशोधन प्रकल्पांवर काम करत आहेत असे त्यांनी सांगितले.
प्रोफेसर नरेंद्र मोहन म्हणाले, आमच्यासमोर अजूनही काही आव्हाने आहेत. आम्ही मोठ्या साखर कंपन्या आणि उच्च संस्थांशी सतत संवाद साधत आहोत. तथापि, काही नामांकित साखर कंपन्या, यंत्रसामग्री उत्पादक कंपन्या आणि सल्लागार कंपन्यांनी या विद्यार्थिनींची भरती करणे हे स्वागतार्ह लक्षण म्हटले पाहिजे.