भुवनेश्वर : ओडिशा सरकारने उपजिविका आणि उत्पन्न वृद्धी [Krushak Assistance for Livelihood and Income Augmentation (KALIA)] योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून ४१ लाख छोट्या, अल्पभूधारक शेतकरी आणि ८५,००० भूमिहीन शेतकऱ्यांना ८६९ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचे वितरण केले. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रानुसार, प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला मदत म्हणून त्याच्या थेट बँक खात्यात २,००० रुपये देण्यात आले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले की, कालिया योजना ही देशातील सर्वात चांगली योजना आहे. यातून भूमीहीन शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे रक्षण करण्यासाठी मदत करण्याचा विश्वास छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणार आहे.
मुख्यमंत्री पटनायक म्हणाले की, मे महिन्यात अक्षय तृतीयेवेळी आम्ही शेतकरी बांधवांसाठी ८०० कोटी रुपयांहून अधिक निधीचे वितरण केले होते. मला अपेक्षा आहे की, या मदतीतून त्यांना आपली शेतीची कामे पूर्ण करण्यास मदत होईल. मुख्यमंत्री पटनायक यांनी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबत मदतीचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, मी सांगू इच्छितो की आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहे. तुमच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे. पिकांच्या नुकसानीबाबत लवकरच तुम्हाला मदत मिळेल. आमच्या शेतकऱ्यांनी ओडिशासाठी गौरवास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी अन्न सुरक्षेत राज्याला प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लोक शेतकऱ्यांचे ऋणी आहेत.