भुवनेश्वर : ओडिसा सरकारने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाला पाठबळ देताना इथेनॉल योजनेला मंजुरी देण्यात पुढाकार घेतला आहे. सोमवारी याबाबत जारी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, ओडीसा सरकारने २००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीला मंजुरी दिली आहे. यातून ३५०० हून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्राधिकरणाने जेके बायोटेकद्वारे कटक जिल्ह्यात २५१ कोटी रुपयांच्या धान्यावर आधारित इथेनॉल आणि वीज प्लांटला मंजुरी दिली.
सिंगल विंडो क्लिअरन्स अॅथॉरिटीच्या एका बैठकीत मुख्य सचिव सुरेश चंद्र महापात्र यांनी सांगितले की, उद्योगांनी ओडिसातील कुशल युवकांना रोजगार देण्याची गरज आहे. महापात्र यांनी २०७१ कोटी रुपयांच्या १२ योजनांना मंजुरी दिली. त्यांच्या उभारणीस गती देण्याच्या सूचना केल्या. ते म्हणाले, गेल्या चार महिन्यांत ५८४१ कोटी रुपयांच्या एकूण ४० योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून एकूण २०,३८० लोकांना रोजगार मिळणार आहे.
इथेनॉल उत्पादनास गती देण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्व इथेनॉल उत्पादक राज्ये सकारात्मक पावले उचलत आहेत.