कोल्हापूर : गेल्या सहा दिवसांपासून येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दालन बंद आहे. सहसंचालक ३१ जुलैनंतर अद्यापही कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत, अशी धक्कादायक माहिती आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील ठरलेला दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलन अकुंशच्या पदाधिकाऱ्यांना साखर सहसंचालक कार्यालयातील कक्ष बंद असल्याचे दिसले.
शेतकऱ्यांनी गेल्या हंगामाच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जिल्ह्यात आंदोलन केले. आंदोलनावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी १०० रुपये व ५० रुपये दुसरा हप्ता देण्यास तयार असल्याची संमतीपत्रे दिली होती. त्या बैठकीत पालकमंत्र्यांची याला संमती घेऊन तसे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही हा हप्ता दिलेला नाही. हे पैसे मिळावेत यासाठी आंदोलन अंकुश संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. यावेळी, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.