हिंगोली : थकित एफआरपीची रक्कम तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत रविवारी हा प्रकार घडला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांच्या वाहनास घेराव घातला. कारखाना प्रशासनाने थकीत बिले देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.
ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, रविवारी (६ जुलै २०२३) टोकाई कारखाना कार्यस्थळावर विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात गाळप क्षमता वाढवणे, नवीन सभासद वाढवणे आदी विषय सभेसमोर होते. व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव, संचालक साहेबराव पतंगे, मनोज कनेवार, सुनील बागल, विलासराव नादरे, गजानन जाधव, शिवाजी सवंडकर यांच्यासह संचालक उपस्थित होते. कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन १२५० टनांवरून २५०० टन करण्याचा विषय उपस्थित करण्यात आला. यावेळी थकीत एफआरपीच्या मुद्यावरून सभासद संतप्त झाले. अगोदर एफआरपीचे पैसे द्या, नंतर निर्णय घ्या, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली. याच दरम्यान, गाळप क्षमता वाढीसह इतर निर्णय घेण्यात आले. सभेनंतर शेतकऱ्यांनी ॲड. जाधव यांच्यासह संचालकांच्या वाहनांस घेराव घातला. जाधव यांनी थकीत एफआरपीपैकी ७५ टक्के रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत आणि उर्वरित रक्कम टप्प्याटप्याने देऊ, असे आश्वासन दिले.