नवी दिल्ली : भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करीत आहे. त्यामुळे मे महिन्यात रशियाकडील तेल आयात १.९५ मिलियन बॅरल प्रती दिन या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. दुसरीकडे सौदी अरेबिया आणि इराककडून होणारी तेल खरेदी कमी झाली आहे. याशिवाय, भारत हा जगातील तृतीय क्रमांकाचा तेल आयातदार व ग्राहक आहे. भारताला आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल परदेशातून आयात करावे लागते.
एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रशिया -युक्रेन युद्धामुळे तेल रिफायनरींनी रशियावर जादा लक्ष केंद्रीत केले आहे. मे महिन्यात भारताने कच्च्या तेलाची ४० टक्के आयात रशियाकडून केल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. त्यामुळे इराककडून होणारी आयात तीन वर्षाच्या निचांकी स्तरावर आणि सौदी अरेबियाकडील आयात २०२१ नंतरच्या खालच्या स्तरावर आली आहे.
अहवालात म्हटले आहे की, भारताने मे महिन्यात ८०१४०० बीपीडी तेल आयात इराकमधून केली. एप्रिलपेक्षा ती १३.७ टक्के कमी आहे. सौदीचा पुरवठा १५ टक्के घसरून ६,१६,१०० बिपीडीवर आला. भारताची एकूण तेल आयात ४.८ मिलियन बिपिडी झाली आहे. आगामी काळातही रशियाकडून अधिक आयात केली जाईल अशी शक्यता आहे. कारण, त्यांच्याकडून तेल खरेदीचा खर्च इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. मध्य पूर्वेतील आयातीचा हिस्सा एप्रिल महिन्यात ४४ टक्क्यांवरुन खालावून मे महिन्यात ३९ टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात तेल आयात ओपेकच्या हिश्यातील ४२.६ टक्के यास्तरावर आली.