नवी दिल्ली : इंधन वितरण कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली जाण्याची शक्यता सरकारी सुत्रांनी व्यक्त केली आहे. कंपन्यांनी आपल्या तोट्याची जवळपास भरपाई पूर्ण केली आहे. आणि त्या सामान्य स्थितीच्या जवळ पोहोचल्या आहेत, असे त्यांच्या सकारात्मक तिमाही परिणामांतून स्पष्ट झाले आहे. परिणामी कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता कपात करतील, कारण त्यांना या इंधन दरामध्ये अंडर रिकव्हरीचा सामना करावा लागणार नाही.
ANI च्या रिपोर्टनुसार, OMCs ची चांगली तिमाही कामगिरी झाली आहे आणि चांगल्या परिणामांकडे ते जात आहेत. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेच्या (ओपेक) सदस्यांपैकी एकाकडून तेल उत्पादनात केलेली कपात वैकल्पिक बाजारावर परिणाम करणार नाही. कपातीचा थोडा परिणाम होईल, मात्र, फारसा नाही असे पेट्रोलिमय आणि गॅस मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
रविवारी ओपेक प्लस देशांनी उर्वरीत वर्षासाठी आपल्या नियोजित तेल उत्पादन कपातीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जगातील प्रमुख तेल निर्यातदार देश सौदी अरेबियाने सुद्धा स्वेच्छेने जुलैपासून उत्पादनात आणखी कपात करण्याची इच्छा दर्शवली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तेल उत्पादकांच्या या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात तुटवडा होण्याची शक्यता नाही. बाजारात कच्च्या तेलाची कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही इंधनाच्या उपलब्धेचे यशस्वीपणे नियोजन केले आहे. आम्ही आज ग्रीन हायड्रोजन मिशनवर ओएमसींसोबत बैठक घेतली आहे. २० टक्के इथेनॉल मिश्रण गाठण्यासाठीच्या सरकारच्या योजना योग्य मार्गावर आहे. आता ऑटो कंपन्या नव्या तंत्रज्ञानासह इंजिन तंत्रज्ञानात प्रगती साधत आहेत, असे त्यांनी सांगितले.