क्रूड ऑईल दर : २ आठवड्यात तेल दराची उसळी थंडावणार, पेट्रोल-डिझेल दरवाढ नाही ?

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियातील युद्धादरम्यान शेअर बाजारातील घसरण आणि कच्च्या तेलाच्या दरात तेजी आली आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर देत अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात कडक निर्बंध लागू केले आहेत. अमेरिकेने रशियाचे तेल, गॅस आयातीवर बंदी घातली आहे. गतीने बदललेल्या या घटनाक्रमात क्रूड ऑईल १४ वर्षांच्या उच्चांकी स्थितीत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना महागड्या पेट्रोल-डिझेलची चिंता सतावत आहे. मात्र, एका बड्या सरकारी तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पुढील काही दिवसांत स्थिती सुधारू शकते.

आज-तकने दिलेल्या वृत्तानुसार, बीपीसीएलचे चेअरमन तथा एमडी अरुण कुमार यांच्या हवाल्याने ईटीच्या अहवालात म्हटले आहे की कच्चे तेलाच्या दरात पुढील २ आठवड्यात विक्रमी घसरण होईल. क्रूड ऑईल दोन आठवड्यात १०० डॉलरपेक्षा कमी होईल. सध्याचे दर जगाला परवडणारे नाहीत. त्यामुळे मागणी २-३ टक्के घसरू शकते. युद्धाचा तोडगा निघाल्यानंतर हा दर ९० डॉलर प्रती बॅरल पर्यंत येऊ शकतो. सरकारी कंपनीला पुढील महिन्यात दोन कार्गो डिलिव्हरी मिळणार आहेत. भारतीय रिफायनींग कंपन्या स्पॉट मार्केटमधून ३०-४० टक्के खरेदी करतात. बीपीसीएलने रशियाकडून क्रूडची खरेदी केली आहे, ती स्पॉट मार्केट आहे. याशिवाय लाँग टर्म क्रूड खरेदी केले जाते. सर्व कंपन्यांकडे एक महिन्याचा अतिरिक्त साठा असतो असे अरुण कुमार म्हणाले. आताही मे महिन्यापर्यंतचा साठा सर्व कंपन्यांकडे आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. चार महिन्यांपासून दरात बदल झालेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here