कोल्हापूर : ओलम शुगर कंपनीने चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सीमा भागातील शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून यशस्वी वाटचाल केली आहे. येत्या तीन ते चार वर्षांत १२ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांचे हित जपले जाईल, असे प्रतिपादन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी व्यक्त केले. राजगोळी खुर्द येथील ओलम ग्लोबल अँग्री कमोडीटीज इंडिया प्रा. लि. कारखान्याच्या १४ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कारखान्याच्या कामाचा आढावा घेतला. कंपनीचे इंडिया हेड संजय सचेती म्हणाले, कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नाते अतूट आहे. हे नाते वृद्धींगत केले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी कृषी अधिकारी अनिकेत माने, अमोल पाटील, संतोष गुरव, अनिल पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. आदित्य चौधरी, नीता लिंबोर, शशांक शेखर, सरपंच सुनंदा कडोलकर, कविता पाटील, दत्तू पाटील, परशराम कांबळे आदी उपस्थित होते. सतीश कागनकर यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले.