कोल्हापूर : राजगोळी (ता. चंदगड) येथे ओलम साखर कारखान्याचा चौदाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांच्या हस्ते पार पडला. यंदा ७ लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे कुंडल यांनी सांगितले. यंदाही शेतकऱ्यांचा ओलम साखर कारखान्याला ऊस पाठविण्याकडे कल अधिक आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भरत कुंडल म्हणाले की, गेल्यावर्षीचा उसाचा गळीत हंगाम चांगला गेला. सध्या कारखान्याचे देखभाल दुरुस्तीचे काम चालू आहे. यावर्षी ७ लाख टन गाळप उद्दिष्ट ठेवले आहे. यंदाही उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट नक्की गाठू. गडहिंग्लज उपविभागासह सीमाभागातील ऊस नेण्यासाठी जास्त वाहनांचे करार झाले आहेत. कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या गाठी-भेटी सुरू आहेत. शेती विभाग शेतकऱ्यांच्या प्लॉटला प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करीत आहे. यावेळी ओलम शुगर्सच्या एचआर नीता निबोरे, बाहुबली बेळवी, शशांक शेखर, योगेश बी. आर, हेमरस युनियनचे अध्यक्ष शांताराम गुरव, रमेश पाटील, गणपत पाटील, अनिल पाटील, नामदेव पाटील, भागोजी लांडे, रणजित सरदेसाई, राजू निर्मले आदी उपस्थित होते.