नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रती लिटर ६.८७ रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली आहे. अहवालानुसार आता सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलची किंमत ४९.४१ रुपयांवरून ५६.२८ रुपये लिटर होईल. या घोषणेने इथेनॉल उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ओएमसींनी नुकतेच उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसवर आधारित इथेनॉलचे सुधारित वाटप जारी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या १५ डिसेंबरच्या आदेशानुसार, ओएमसींना उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसवर आधारित इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी प्रत्येक डिस्टिलरीला सुधारित वाटप करण्यास आणि सुधारित करार नियुक्त करण्यास सांगितले होते. या इथेनॉल उत्पादनासाठी १७ लाख टन साखर वळविण्याची मर्यादा आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये, ओएमसींनी या वर्षासाठी ८२५ कोटी लिटर इथेनॉलसाठी निविदा जारी केल्या होत्या. यामध्ये साखरेवर आधारित फीडस्टॉकमधून २६५ कोटी लिटर, उसाच्या रसावर आधारित इथेनॉलमधून १३५ कोटी लिटर आणि बी हेवी मोलॅसिसपासून १३५ कोटी लिटर असे वाटप करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १५७ कोटी लिटर पुन्हा वाटप केले गेले आहे, यामध्ये उसाच्या रसापासून ४२ कोटी लिटर आणि बी हेवी मोलॅसिसपासून ११५ कोटी लिटरचा समावेश आहे. देशात ३० नोव्हेंबरअखेर इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे १३८० कोटी लिटर आहे. त्यापैकी सुमारे ८७५ कोटी लिटर मोलॅसिसवर आधारित आहे. तर ५०५ कोटी लिटर धान्य आधारित आहे. देशात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट आहे.