कोल्हापूर : ओंकार ग्रुपच्या पाच युनिटच्या माध्यमातून आगामी गाळप हंगामात एकूण ४२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली. येथील ओंकार शुगर अँड डिस्टलरी पॉवर प्रा. लि. फराळे साखर कारखान्याच्या रोलर मिल पूजनप्रसंगी ते बोलत होते. बोत्रे-पाटील म्हणाले, फराळे साखर कारखान्याला ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना परिसरातील इतर कारखान्यांप्रमाणेच जादा दर दिला जाईल. कारखाना प्रशासन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचेही बोत्रे- पाटील यांनी सांगितले.
बोत्रे- पाटील म्हणाले कि, फराळे साखर कारखान्यातर्फे ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भक्कम करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केले. यावेळी ओमराजे बोत्रे-पाटील, प्रशांत बोत्रे-पाटील, रेखाताई बोत्रे-पाटील, गौरी बोत्रे-पाटील, पूजा साळवी, गणेश पाटील, मुख्य शेती अधिकारी समीर व्हरकट आदी उपस्थित होते.