कोल्हापूर : ओंकार शुगर फराळे साखर कारखान्याने महाराष्ट्र साखर संघाने लागू केलेला त्रिपक्षीय तोडणी दर, मजुरीवाढ गत हंगामापासून लागू करण्यात आली आहे. आता ३४ टक्के वाढीप्रमाणे तोडणी दर आणि २० टक्के कमिशन असा तोडणी दरातील फरक लवकरच खात्यावर जमा केला जाईल, अशी माहिती चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील यांनी दिली. झालेल्या गळीत हंगामातील सर्व तोडणी वाहतुकीचे व ऊस बिले वेळेत आदा केल्याने शेतकरी व तोडणी वाहतूकदार यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे, असे त्यांनी सांगितले.
चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले की, कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मधील तोडणी दर ३४ टक्के वाढीप्रमाणे ३६६ रुपये व त्यावरील वीस टक्के कमिशन ७३.२० असा एकूण ४३९.२० रुपये तोडणी दर आगे. यातील प्रती टन ११४.१७ रुपयांचा फरक कारखाना लवकरच देणार आहे. आता हंगाम २०२४-२५ साठी कारखान्याकडे उच्चांकी ४०० वाहनांचे करार पूर्ण झाले आहेत. आता तोडणी वाहतूक करार घेणे बंद करण्यात आले आहेत. करार केलेल्या वाहनधारकांना ६० टक्के अॅडव्हान्सपोटी १०.१० कोटी मे महिन्यामध्ये अदा केले आहेत. यावेळी जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील, मुख्य शेती अधिकारी समीरकुमार व्हरकट, चिफ अकौंटंट शरद पाटील, चिफ इंजिनिअर महांतेश तोडकर, चिफ केमिस्ट कामदेव मुदीराज, केनयार्ड सुपरवायझर राहुल यादव, स्टोअरकिपर रोहित जाधव आदी उपस्थित होते.