कोल्हापूर : फराळे (ता. राधानगरी) येथील ओंकार शुगर डिस्टीलरी साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे प्रतिटन ३१५० रुपये यांप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. आता व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार १ ते ३१ जानेवारी या एक महिन्यात येणाऱ्या उसास प्रतिटन १०० रुपये गाळप अनुदान देणार आहे. तर फेब्रुवारीतील उसाला आणखी ५० रुपये जादा देण्यात येतील , अशी घोषणा बाबुराव बोत्रे- पाटील यांनी केली.
ओंकार शुगरने फेब्रुवारीपासूनच्या उसास प्रती टन १५० रुपये अतिरिक्त गळीत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात गाळप होणाऱ्या उसासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन ३२५० रुपये दर मिळणार आहे. १ फेब्रुवारी ते हंगाम अखेरपर्यंत गाळपास येणाऱ्या उसाला प्रती टन १५० रुपये म्हणजेच ३३०० रुपये शेतकऱ्यांना ऊस दर मिळणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी शत्रुघ्न पाटील, टेक. जीएम आर. आर. देसाई, दिलीप बरगे, समीरकुमार व्हरकट, शरद पाटील आदी उपस्थित होते.