कोल्हापूर, दि. 20 सप्टेंबर 2018 : सरकारने एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नूकसान केले आहे. त्यामुळे सर्व एफआरपी एक रक्कमी मिळाली पाहिजे. तसेच, 9 टक्के रिकव्हरीनूसारच यावर्षीची एफआरपी मिळाली पाहिजे. यासाठी, 10 ऑक्टोबरला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे दुपारी 12 ते 4 या वेळेत ऊस परिषद घेणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज दिली. कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
श्री पाटील म्हणले, केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे करत आहेत. सध्याची एफआरपी चौदा दिवसात देण्याचा कायदा असतानाही त्याचे दोन ते तीन तुकडे केले जातात. कायदा मोडला जातो. असे असताना आता एफआरपीची रक्कम दोन टप्प्यात देण्याची मागणी केली जात आहे. हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. गेल्यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थिने एफआरपी अधिक 200 रुपये असा दर देण्याचे कारखान्यांनी मान्य केले होते. मात्र, वरील 200 रुपयांबाबत आता कोणीही बोलत नाही. काहींची एफआरपीची रक्कमही थकली आहे. शासन यावर तत्काळ निर्णय घेतला पाहिजे.
एफआरपी ठरवताना 9 टक्के रिकव्हरीच गृहित धरली पाहिजे. यामध्येही शासनाने 10 टक्के रिकव्हरी धरून एफआरपी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानूसार दर मिळण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे 9 टक्के रिकव्हरीप्रमाणेच दर मिळावा यासाठी आवाज उठविला जाणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.