धाराशिव : नॅचरल शुगर व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) यांच्या द्वारे आयोजित डिजिटल शेतीशाळा वर्गाला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ऊस पिकामध्ये आढळणारी कीड व अन्नद्रव्य कमतरतेमुळे घटत असणाऱ्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या आणि उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने नॅचरल शुगरचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे, संचालक पांडुरंग आवाड, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन ‘डिजिटल शेतीशाळा’ घेण्यात आली.
डिजिटल शेतीशाळा वर्गाच्या प्रास्ताविकात कृषीभूषण पांडुरंग आवाड यांनी कारखाना कार्यक्षेत्रात झालेली एकूण ऊस लागवड, कारखान्यातर्फे वाटप केलेले अनुदानित ऊस रोप, डिजिटल शेतीशाळेचा उद्देश याबाबत मार्गदर्शन केले. ऊस विकास अधिकारी येळकर यांनी ऊस पिकावरील कीड रोग अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण झालेली विकृती याबाबत व्यवस्थापन उपाययोजना सुचवल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. सुनिल दळवी यांनी ‘वसंत ऊर्जाचा वापर व त्याचे फायदे’ संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. ‘नॅचरल शुगर’चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी ऊस पिकामध्ये संतुलित खतांचा वापर करण्यासाठी नॅचरल शुगर उत्पादित नॅचरल पोटॅश, नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर, फर्मेंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर ही खते शेतकऱ्यांसाठी माफक दरात उपलब्ध केल्याचे सांगितले. तसेच कारखान्याच्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कारखान्याचे संचालक अनिल ठोंबरे यांनी डिजिटल शेतीशाळा वर्गामध्ये उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून शेतकऱ्यांना नॅचरल बझार येथे उपलब्ध असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निविष्ठा माफक दरात उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रशिक्षणात उपस्थित शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराप्राप्त शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी नॅचरल शुगर मार्फत आयोजित डिजिटल शेतीशाळा वर्गाचा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठी फायदा होईल याबाबत मत व्यक्त केले. यावेळी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
…असे करा ऊस पिकामधील कीड रोग अन्नद्रव्य विकृतीचे एकात्मिक व्यवस्थापन
ऊस पिकामध्ये वाढत्या तापमानाचा ताण पडत असेल तर १३ : ०० : ४५ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट २ मिली व वसंत ऊर्जा ५ मिली प्रति १ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
ऊस पिकामध्ये सद्यस्थितीत निदर्शनास येत असलेल्या ऊसावरील पोंगेमर व लोकरी माव्याच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २० मिली प्रति किंवा सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १५ मिली किंवा फिप्रोनिल (५ टक्के एस.सी.) २० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
लोकरी मावा पानांच्या खाली असल्याने व त्यावर लोकरीसारखे आवरण असल्याकारणाने कीटकनाशकाचे द्रावण किडी पर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी द्रावणास चिकटपणा येण्यासाठी उत्तम दर्जाचे स्टिकर १ मि.ली प्रति लिटर द्रावणामध्ये मिसळावे तसेच फवारणी करताना फवारणीचे द्रावण पानांच्या खालच्या बाजूने जाईल अशा पद्धतीने फवारणी करावी.
ऊस पिकांमधील चाबुक काणी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त उसाचे बेट मुळासकट उपटून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन नष्ट करावे हे करत असताना काळी पावडर इतर ऊसावर किंवा शेतामध्ये पडणार नाही याची काळजी घ्यावी.
काणी रोगाच्या प्रादुर्भाव व्यवस्थापनासाठी ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्के एससी या संयुक्त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
– शिवप्रसाद रामप्रसाद येळकर, ऊस विकास अधिकारी, नॅचरल शुगर, रांजणी.