बस्ती: बभनान साखर कारखान्याने एक कोटी क्विंटल ऊस गाळप करून हंगाम समाप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना तोडणी पावत्या देण्यात आल्या आहेत. आता कारखान्याच्या गेटसह खरेदी केंद्रांवर खुलेपणाने ऊस खरेदी सुरू झाली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यानंतर कारखाना बंद करण्यात येणार आहे.
बभनान साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये बभनान, गौर, विकरमज्योत, वाल्टरगंज, टिनीच, मानकापूर, गौराचौकी या समित्यांकडून २५ नोव्हेंबर रोजी ऊस खरेदी सुरू केली. ऊस खरेदीसाठी एकूण ७९ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या यातील ४० केंद्रे बंद झाली आहेत. ३९ केंद्रांतून खरेदी सुरू आहे. कारखान्याने आतापर्यंत ३१३ कोटी ८३ लाख २९ हजार रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. दोन मार्चअखेर खरेदी केलेल्या उसापोटी २३९ कोटी ८२ लाख रुपये शेतकऱ्यांना बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
कारखाना बंद होणार असल्याची नोटीस दुसऱ्यांदा देण्यात आली आहे. गळीतासाठी सध्या पुरेसा ऊस नाही. जर शेतकऱ्यांकडे ऊस असेल तर तो लवकरच पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ऊस विभागचे महाव्यवस्थापक पी. के चतुर्वेदी यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांकडे को ०२३८ आणि ०११८ प्रजातीचा ऊस आहे, त्यांनी तो बियाण्यासाठी शिल्लक ठेवावा. ज्या शेतकऱ्यांकडे ९४१८४ प्रजातीचा ऊस आहे, त्यांनी तो कारखान्यांकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी केले.