सोलापूर : येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने या हंगामात गेल्या ५८ दिवसांत, १७ जानेवारी अखेर दोन लाख ७८० मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने एक लाख ९८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा ११.१५ टक्के मिळाला आहे. दामाजी कारखान्याची इतर कारखान्यांच्या तुलनेत गाळप क्षमता कमी असूनसुद्धा चांगले गाळप केले आहे. ऊस तोडणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरल्याने दररोज सरासरी ३७०० ते ३९०० मे. टन प्रतिदिन गाळप होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली. कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास व निष्ठा असल्याने गळितासाठी उसाची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी सांगितले की, कारखान्याने ऊस उत्पादकांची १५ डिसेंबरअखेर पुरवठा झालेल्या उसाला प्रती टन २८०० रुपये दर दिला आहे. ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची बिले, कामगारांचे पगार, व्यापारी बिले वेळेवर देऊन सर्व घटकांना सामावून घेऊन आमचे संचालक मंडळ काटकसरीने कामकाज करीत आहे. यावेळी संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय आदी उपस्थित होते.