उत्तर प्रदेशात येत्या हंगामात आणखी एका साखर कारखान्याची भर

लखनौ : उत्तर प्रदेशात आगामी गाळप हंगामात आणखी एका नव्या साखर कारखान्याची भर पडणार आहे. बिजनौरच्या चांदपूर भागातील बिंदल समूहाचा नवीन खाजगी साखर कारखाना आणि डिस्टिलरी यंदा  उसाचे गाळप करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी २०१७-१८ च्या गळीत हंगामात बुलंदशहरमध्ये वेव्ह ग्रुपचा बंद साखर कारखाना सुरू करण्यात आला होता. नवीन कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांना त्यांचा ऊस वेळेत गाळप करण्यास मदत होणार आहे.

‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, २०१६-१७ च्या गळीत हंगामात राज्यात ११६ साखर कारखाने सुरू होते. त्यावेळी सपा सरकारच्या कार्यकाळात आझमगडच्या साठियावमध्ये सहकार क्षेत्रात नवा साखर कारखाना सुरू झाला. त्यानंतर भाजपच्या राजवटीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांमुळे पूर्वांचलमधील पिपराइच आणि मुंडेरवा या दोन बंद पडलेल्या जुन्या साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण करून त्यांची गाळप क्षमता वाढविण्यात आली.

दरम्यान, राज्यात नवीन गळीत हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. यंदा ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला गळीत हंगाम सुरू होऊ शकतो. यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांना उसाचा जादा भाव देणार आहे. राज्य सरकारकडून एसएपीमध्ये २५ रुपये प्रती क्विंटल वाढ केली जाऊ शकते असा अंदाज आहे. गेल्यावर्षी उसाला अनुक्रमे ३४० रुपये आणि ३५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here