मुंबई : होलसेल बाजारात कांदा दरात घसरण झाली असली तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याचे दर अद्याप चढेच आहेत. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला गुरुवारी (२ नोव्हेंबर) सरासरी ३९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गत सप्ताहाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात १४०० रुपयांची घसरण झाली. २७ ऑक्टोबर रोजी सरासरी ५३०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला गेला होता. असे असले तरी किरकोळ बाजारात कांदा अद्याप 60 ते ७० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे.
दिवाळीनिमित्त लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्या ९ ते १८ नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजापेठेत आणला. मात्र आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर झपाट्याने घसरले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यातमूल्यात ८०० डॉलर प्रतिदराने वाढ केल्याने निर्यात जवळपास ठप्प झाली आहे.
देशात कांद्याचे भाव वाढल्याने महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 10 दिवसांत 25 ते 30 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 80 ते 90 रुपये किलोने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटोने ग्राहकांना रडवले होते. आता कांदा डोळ्यात पाणी आणत आहे. गेल्या 10-15 दिवसांपूर्वी 25 ते 30 रुपये किलोने विकला जाणारा कांदा सध्या 80 ते 90 रुपये किलोने विकला जात आहे. दिवाळीपूर्वीच महागाईचे फटाके फुटत आहेत.