आतापर्यंत टार्गेटच्या २४ टक्केच साखरेची निर्यात

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा

पुणे : चीनी मंडी

ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला तरी, साखर निर्यातीची गाडी अद्याप रोडावलेलीच आहे. आतापर्यंत एकूण साखर निर्यात टार्गेटच्या केवळ २४ टक्केच टार्गेट पूर्ण करता आल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखान्यांची साखर बँकांकडे तारण असल्यामुळे निर्यातीचे घोडे अडलेले आहे.

भारतातील बाजारपेठेला २६० लाख टन साखरेची गरज आहे. पण, जवळपास सलग दोन वर्षे देशात गरजेपेक्षा जास्त साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे सरकारने अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट कारखान्यांना दिले. त्यातून साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठीही मदत होईल, असा उद्देश होता. साखरेचा स्थानिक बाजारातील दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील निचांकी दरामुळे शॉर्ट मार्जिनचा प्रश्न कारखान्यांपुढे होता. कारखान्यांची साखर बँकांकडे तारण असल्याने बँकांनी कमी दराने साखर निर्यात करण्यास विरोध केला. त्यावर महाराष्ट्रात राज्य सहकारी बँकेने शॉर्ट मार्जिनवर तोडगा काढण्यासाठी कारखान्यांना १४ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यास अनुमती दिली. पण, शेड्युल्ड कमर्शिअल बँकांनी मात्र त्याला अनुमती दिली नाही.

साखर निर्यातीमुळे कारखान्यांकडे कॅशफ्लो वाढण्याची अपेक्षा होती. पण, निर्यातीसाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत भारतातून केवळ १२ लाख टन साखर निर्यात  झाली आहे. यंदाचा हंगाम सप्टेंबर २०१९मध्ये संपणार असताना केवळ २५ ते ३० लाख टनच साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरल्यामुळे साखर कारखान्यांना प्रति किलो १० ते ११ रुपयांचे शॉर्ट मार्जिन सहन करावे लागते. त्यामुळे कारखान्यांना निर्यातीची धास्ती आहे. बँकांनी तारण साखर खुली करण्यास नकार दिल्याने अनेक साखर कारखान्यांची निर्यात खोळंबली आहे. राज्य सहकारी बँकेने शॉर्ट मार्जिन भरून काढण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज देण्याची योजना जाहीर केली. पण, इतर शेड्युल्ड तसेच जिल्हा बँकांनी त्याचे अनुकरण केले नाही. आतापर्यंत झालेल्या १२ लाख टन निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ३ लाख टन आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ म्हणाले, ‘कच्च्या साखरेसाठी चीनची बाजारपेठ खुली झाल्यानंतर निर्यातीचे आणखी करार होतील.’ दरम्यान, हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने कच्च्या साखरेचे उत्पादन जवळपास थांबवण्यात आले आहे. राज्यातील १९३ पैकी पाच साखर कारखान्यांनी त्यांचे कामकाज थांबवले आहे. या महिन्याच्या अखेरीस आणखी काही कारखान्यांचे काम थांबणार आहे. यात पुणे, अहमदनगर, सोलापूर, आणि नाशिक या जिल्ह्यांतील कारखान्यांचा समावेश आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप उशिरा सुरू झाल्याने त्यांचा हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. कारखान्यांचे कामकाज थांबल्यानंतर होणारी साखर निर्यात केवळ प्रक्रियायुक्त साखरेचीच असेल.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here