कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस दर आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. शेतकरी संघटनांबरोबरच ऊस उत्पादक शेतकरीदेखील दरासाठी आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर ग्रामस्थांनी ऊसदरासाठी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. मागील वर्षाच्या उसाला ४०० रुपये आणि या वर्षीच्या उसाला ३५०० रुपये एकरकमी दर जाहीर करून तसे ग्रामपंचायतीमध्ये लेखी द्यावे आणि गावात प्रवेश करावा अन्यथा एकाही राजकीय नेत्याला किंवा ‘बिद्री’च्या उमेदवारांना गावात येऊ देणार नाही, असा एकमुखी निर्धार कपिलेश्वर गावाने केला आहे.
ऊस दर आंदोलनाबरोबरच जिल्ह्यात बिद्री साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणी लेखी देऊन आमची फसवणूक केली तर असाच फलक त्याच्या गावाच्या मुख्य चौकात लावणार, असाही पवित्रा येथील तरुणांनी घेतल्यामुळे आता राजकीय नेत्यांची पंचायत झाली आहे. यावेळी दत्तात्रेय मनुगडे, संजय गवते, कृष्णात पाटील, व्यंकटेश चव्हाण, कृष्णात बाबर, शरद पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
उसाला मिळणारा दर हा उत्पन्न खर्च लक्षात घेता फार कमी असल्याने शेतकरी कर्जबाजारी तर कारखानदार आणि राजकीय नेते मालामाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत देऊ न शकणाऱ्या राजकीय नेत्यांचे गावात काय काम? या भावनेतून गावातील सर्व शेतकरी, नागरिकांनी हा एकमुखी निर्णय घेतल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.