नवी दिल्ली : साखर निर्यातीबाबत अनिश्चिततेचे सावट आहे. कारण भारत सरकारकडून कमीत कमी २०२४ च्या पहिल्या सहामाहीत साखर निर्यात करण्याची घोषणा केली जाणार नाही असे अनुमान आहे. चालू हंगामात सरकारने साखर निर्यातीच्या दुसऱ्या लॉटला मंजुरी दिली नाही. कृषी उत्पादनावर अल निनोचा प्रभाव पाहता देशांतर्गत खपासाठी पुरेसा साखर साठा राखणे हा त्याचा उद्देश होता. अहवालानुसार, केंद्र सरकार सध्या सतर्क आहे. उत्पादनाचे प्रमाण पडताळण्यासाठी आणखी काही महिन्यांची गरज आहे. त्यामुळे साखर निर्यातीबाबत घाईगडबडीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
पुढील हंगामाच्या साखर निर्यातीबाबत चर्चेदरम्यान, सद्यस्थितीत हंगाम २०२३-२४ चा सुरुवातीला साठा ६० लाख मेट्रिक टनच्या आसपास राहील अशी शक्यता आहे. AgriMandi.Live च्या म्हणण्यानुसार, चालू हंगामाची सुरुवात ६१ LMT या सुरुवातीच्या साठ्यासह झाली. हंगाम २०२२-२३ मध्ये साखर उत्पादन कमी होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचे अनुमान ३२७ एलएमटी होते. आधीच्या हंगामाच्या तुलनेत हे उत्पादन ३२ एमएमटीने कमी आहे.
जवळपास ४३ एलएमटी साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी केला जाईल. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे प्रमाण ७ एलएमटीने अधिक आहे. यातून इथेनॉल उत्पादन वाढीचे संकेत दिसतात. कच्च्या तेलाची आयात कमी करून स्वच्छ ऊर्जेकडे जाण्याचे पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. चालू हंगामात २७५ एलएमटी अनुमानीत खप आणि ६१ एलएमटी साखर निर्यात लक्षात घेता AgriMandi.Live च्या अनुमानानुसार आगामी हंगामाचा सुरुवातीचा साठा ६१ एलएमटी असेल.
मान्सूनच्या प्रगतीवर नजर
गेल्या हंगाात भारताने उच्चांकी ११० एलएमटी साखर निर्यात केली होती. केंद्र सरकार किमतींवर बारीक लक्ष ठेवून आहे. साखर उत्पादनातील घटीमुळे दरवाढीवर नजर ठेवली जात आहे. सप्टेंबर महिन्यात सरकार अन्न उत्पादन आणि ऊसासह व्यावसायिक पिकांच्या उत्पादनाबाबत पहिले अग्रीम अनुमान जारी करेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात मान्सून सक्रीय आहे. पुढील काही दिवसांत विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल. अल निनोबाबत चिंतेची स्थिती आहे. त्यामुळे साखरेचे वास्तविक उत्पादन लक्षात घेण्यासाठी मान्सूनच्या प्रगतीवर नजर ठेवावी लागेल.