नवी दिल्ली : चीनी मंडी
कंबोडियातील तीन मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांनी मिळून यंदा हंगामाच्या पहिल्या नऊ महिन्यांत १ लाख २० हजार १२६ टन कच्च्या साखरेची निर्मिती केली आहे, अशी माहिती कंबोडियाच्या उद्योग मंत्रालयाने दिली. यात कंबोडियातील रुई फेन्ग कंपनीने ५६ हजार ६६४ टन, यलो फिल्ड कंपनीने ५१ हजार ४२० टन तर कोह कोंग कंपनीने १२ हजार ०४२ टन साखरेची निर्मिती केली आहे.
दरम्यान, २०१६मध्ये कंबोडियातील पाच मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांकडून एकूण निर्मितीच्या चार टक्केच (८० हजार टन) शुद्ध साखर निर्यात झाली होती. या संदर्भात कंबोडियाच्या कृषी मंत्रालयाचे प्रवक्ते श्रेय वुथी म्हणाले, ‘सध्या कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे साखर उद्योगाला विस्ताराची मोठी संधी आहे. या वाढत्या उद्योगाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करण्याची संधी चालून आली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस उत्पादन केले, तर त्यांचा नफा तर वाढणारच आहे, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकी मिळणार आहे.’
ते म्हणाले, ‘आम्ही आता शेतकऱ्यांसोबत काम करत आहोत आणि त्यांना साखर कारखान्यांशी जोडत आहोत. त्यामुळे त्यांना त्यांच्या उसाची चांगली किंमत मिळू शकेल. जर, आमचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले, तर, देशातील ऊस शेती वाढेल आणि साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. यामुळे सर्वांचाच फायदा होईल.’