सितारगंज : सितारगंज येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याच्या निर्णयास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. बुधवारी शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पीपीपी तत्त्वावर देण्याच्या आडून कारखाना भाड्याने दिला जात आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही असा आरोप करण्यात आला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी सांगितले की, सितारगंज कारखान्यात शेतकऱ्यांचे शेअर्स आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारलेला कारखाना खासगी लोकांच्या हाती सोपवला आहे. शेतकरी स्वतः कारखाना चालविण्याची मागणी करत आहेत. यावर्षी कारखाना नफ्यात आला तर तो खासगी लोकांच्या हाती सोपवला गेला. शेतकऱ्यांचा ऊस आता मिळेल त्या दराने खरेदी केला जाईल. पैसे कधी मिळतील याची शाश्वती नाही. कारखाना पीपीपी तत्त्वावर देण्याचा निर्णय जोपर्यंत रद्द केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी भाकियू टिकैतचे राज्य प्रभारी बलजिंदर सिंह मान, भाकियू चढूनीचे प्रदेशाध्यक्ष गुरसेवक सिंह महार, भाकियू जिल्हाध्यक्ष गुरसेवक सिंह, सीटूचे जिल्हाध्यक्ष जगदेव सिंह, नवतेज पाल सिंह, जगीर संह, साहब सिंह, जसवंत सिंह, शक्तिवीर सिंह आदी उपस्थित होते.