सांगवी : श्रीराम कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा आहे. कारखाना योग्य रीतीने पुढे चाललेला आहे. सभासदांना योग्य दर मिळतो आहे. कामगारांचाही पगार वेळेच्या वेळी होत आहे. कामगारांची १८ कोटी देणी दिली आहेत. फंडाची रक्कमही जमा केली आहे. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हा कारखाना सुरू ठेवला आहे. ही संस्था मोठी व्हावी, वाढावी आणि ऊस उत्पादकांचा फायदा व्हावा, या उद्देशाने रामराजे यांनी प्रयत्न केले. सहकारी तत्त्वावर चालणारा हा एकमेव कारखाना आहे. तो सहकारीच आणि सभासदाचाच राहणार, असे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. आमदार सचिन पाटील आणि शिवरूपराजे खर्डेकर यांच्या पत्रकार परिषदेला आज संजीवराजे यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले की, १९९८ मध्ये (कै.) दादाराजे खर्डेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. ते १९९९ मध्ये काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्या काळात शिवरूपराजेही त्यांच्या वडिलांबरोबर होते. त्यामुळे शिवरूपराजे यांनी आता राष्ट्रवादीबद्दल प्रेम दाखवू नये. भाजपमध्ये जे प्रवेश होत आहेत, त्यात शिवरूपराजे दिसत आहेत. मालोजीराजे नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९५७ मध्ये श्रीराम कारखाना सुरू झाला. पुढे शिवाजीराजे यांनीही तो चांगल्या प्रकारे चालवला. कारखाना स्थापनेच्या वेळी (कै.) दादाराजे है फलटणमध्ये नव्हते. १९७२ मध्ये आले, त्यांनीही कारखान्यासाठी योगदान दिले आहे. तालुक्याचे नेतृत्व करत असताना तालुक्यातील संस्था चालल्या पाहिजेत. कारखाना बंद पडल्यानंतर तो चालवला पाहिजे, या उद्देशाने रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांनी कारखान्याचे गाळप, खर्चाविषयी चुकीचे आरोप केले आहेत.