केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच इंधनाबाबत बहुपर्यायांच्या शोधात असतात. भविष्यात भारत पेट्रोलवर कमी अवलंबून कसा राहील यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न सुरू असतात. आता गडकरी यांनी नवी कार खरेदी केली. या कारमध्ये पेट्रोल, डिझेल अथवा सीएनजीवर नव्हे तर हायड्रोजनचा वापर केला जातो. अशा प्रकारचे हायड्रोजन हे इंधन म्हणून विविध शहरात बस, ट्रक आणि कारमध्ये वापरले जावे असे आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले.
नितीन गडकरी हे आर्थिक समायोजन संदर्भात सहाव्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, माझ्याकडे हायड्रोजनवर बस, ट्रक, कार चालाव्यात अशी संकल्पना आहे. त्यासाठी शहरातील सांडपाणी आणि कचऱ्याचा वापर करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. मी वेस्ट टू व्हॅल्यू अशा संकल्पनेवर काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की ते दिल्लीत या हायड्रोजन बेस्ड कारमधून फिरणार आहेत. लोकांना ही कार हायड्रोजनवर धावू शकते याची माहिती कळावी असा याचा उद्देश आहे. मी एका पायलट प्रोजेक्टमधील कार खरेदी केलेली आहे. फरीदाबादमध्ये एका ऑइल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेल्या हरित हायड्रोजनवर ती चालेल. लोकांचा यात विश्वास बसावा यासाठी मी या कारमधून फिरणार आहे, असे ते म्हणाले. गडकरी हे आगामी दोन ते तीन दिवसांत वाहन निर्माता कंपन्यांना फ्लेक्स – फ्ल्यूएल इंजिन अनिवार्य असल्याचा आदेश जारी करणार आहेत.