पुणे : शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांची व बँक खात्यांची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश राज्याचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिले आहेत. राज्याच्या प्रादेशिक सहसंचालकांना हे आदेश देण्यात आले आहेत. साखर कारखाना अद्याप बंद असल्याने भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले होते.
पाचंगे यांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आजी-माजी चेअरमनच्या खासगी कारखान्याचे हित जोपासण्यासाठी कारखाना बंद पाडण्याचा कट रचण्यात येत आहे का याच्या चौकशीची मागणी केली होती. चेअरमन व संचालक मंडळाचीचौकशी करत संचालक मंडळ बरखास्त करून साखर आयुक्तांनी कारखान्यावर तत्काळ प्रशासक नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांच्या, संपत्तीची चौकशी करावी या मागणीसाठी २७ डिसेंबरपासून कारखान्यासमोर धरणे व बेमुदत आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा संजय पाचंगे यांनी दिला होता.