अहमदनगर : विभागातील साखर कारखानदारांनी दर वर्षीप्रमाणे यंदाही उसाचा दर जाहीर करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी अजून एफआरपीही जाहीर केली नसल्याचे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उघड झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांना दोन दिवसांत एफआरपी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
विविध शेतकरी संघटनांच्या तक्रारीनंतर बुधवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेतकरी संघटना, ऊस वाहतूकदार आदी संघटनेचे नेते, प्रादेशिक साखर सहसंचालक (साखर) कार्यालयातील अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात साखर कारखाने सुरू झाले असले तरी अद्याप त्यांनी दर जाहीर केला नसल्याची तक्रार शेतकरी संघटनांची आहे. यावेळी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, सुरेश ताके उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीत दोन दिवसांमध्ये उसाची एफआरपी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. साखर कारखान्यांनी उसाचा दर निश्चित केलेला नसल्याने शेतकऱ्यांनी कोणत्या कारखान्याला ऊस द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नगर व नाशिक विभागातील कारखान्याचे नियंत्रण येते. हे कार्यालय कारखानदारांच्या बाजूनेच काम करत असल्याचे सातत्याने दिसून येते, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.