सोलापूर : मकाई सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप उसाचे बिल शेतकऱ्यांना अद्याप दिलेले नाही. याबाबत आळजापूर (ता. करमाळा) येथील शेतकरी समाधान शिवदास रणसिंग यांनी थकीत ऊस बिलासंदर्भात न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना करमाळा न्यायालयाचे न्यायाधीश भार्गवी भोसले यांनी कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन दिग्विजय दिगंबर बागल यांच्यासह १७ संचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी तत्कालीन चेअरमन बागल यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील उत्तम पांढरे, महादेव गुंजाळ, नंदकिशोर भोसले, गोकुळ नलावडे, बाळासाहेब सरडे, महादेव सरडे, सुनील शिंदे, रामचंद्र हाके, धर्मराज नाळे, नितीन राख, रंजना कदम, उमा फरतडे, राणी लोखंडे, संतोष पाटील, दत्तात्रय गायकवाड, प्र. कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करावा लागणार आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम आजअखेर दिली नाही. शेतकरी रणसिंग यांनी करमाळा न्यायालयात मकाई कारखान्याने २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये उत्पादित केलेली साखर, बगॅस, मोलॅसिस व अन्य उपउत्पादनांच्या विक्रीतून आलेल्या २६ कोटी ३२ लाख या रक्कमेची इतरत्र विल्हेवाट लावली, असे फिर्यादीत म्हटले होते.