कोल्हापूर : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर खोडवा पिकाला सरासरी निम्म्याने उत्पादन खर्च कमी होतो. हे खोडवा पीक शेतकऱ्यांना वरदान ठरते, असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी व्यक्त केले. कुंभी-कासारी साखर कारखाना व ईश्वर फाउंडेशन मॅन काईंड अँग्री टेक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी भवनमध्ये घेण्यात आलेल्या ऊसपीक परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभी-कासारी कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने होते.
माने – पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते मे यांदरम्यान मिळणाऱ्या स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाशाचा फायदा उठवून ऊस रोपे वाढीला नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. लावणीपासून भरणीपर्यंत पाच वेळा खतांचे डोस देताना सेंद्रिय रासायनिक, जैविक खतांचा समतोल राखणे आवश्यक आहे. ९० व्या दिवशी पक्की भरणी करून रासायनिक खतांचा मोठा डोस द्यावा. भरणीच्या अगोदर सेंद्रिय फवारण्या घ्याव्यात. यावेळी मॅन काईंडचे नितीन गाडेकर, ईश्वर फाउंडेशनचे नितीन जंगम यांनी मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण शिंदे यांनी आभार मानले. शेती अधिकारी संजय साळवी व शेतकरी उपस्थित होते.