कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्यावतीने ३ ते ५ फेब्रुवारीअखेर मॅटवरील वजन गटात मानधनधारक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जिल्ह्यात रुजविलेल्या कुस्ती कलेचा वारसा पुढे चालू राहावा तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील तरुण मुलांना व्यायामाची आवड निर्माण होऊन शरीरसंपदा सुदृढ व्हावी, कुस्ती कलेला उत्तेजन मिळावे, या उद्देशाने उदयोन्मुख मल्लांसाठी याचे आयोजन केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.
विजयी होणाऱ्या स्पर्धकांना वजन गटानुसार एक वर्षाकरिता मासिक मानधन दिले जाणार आहे. गटनिहाय २५०० रुपये ते ७००० रुपये असे हे मानधन असेल. इच्छुक स्पर्धकांनी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत वजन देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहावे. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक मल्लांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले. उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सर्व संचालक, व्यस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले उपस्थित होते.