आमची दिवाळी उसाच्या फडातच : ऊसतोड कामगारांनी मांडली व्यथा

लातूर : राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी मजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला असताना पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजुरांची दिवाळी यंदाही उसाच्या फडातच साजरी होणार असल्याचे चित्र आहे. यावर्षीचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने ऊसाची टंचाई आहे. मात्र गेल्या काही दिवसांसून तालुक्यात दिवाळीच्या तयारीला वेग आला आहे. घरोघरी आकाश कंदील, लायटिंगचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी, खमंग खाद्यपदार्थ असे चित्र काही दिवसात दिसेल. मात्र, ऊस तोडणी मजुरांची दिवाळी मात्र उसाच्या फडातच होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

मजूर मुलांबाळासह शिरूर अनंतपाळ तालुक्यात दाखल झाले आहेत. कामगारांचा पूर्ण दिवस फडात जातो. तालुक्यात नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यातून तर काही कर्नाटक राज्यातून ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. ऊस तोडणी कामगार प्रतिभा राठोड यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षापासून मी आणि पती ऊस तोडणी कामगार म्हणून काम करतो. आम्हाला दोन मुले आहेत. त्यांच्याही हातात आज ऊस तोडण्यासाठी कोयते आले आहेत. दरम्यान, ऊस तोडणी मजूर ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता कार्यरत आहेत. या ऊसतोड मजुरांच्या जीवनात दिवाळीची पहाट येण्याची गरज आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here