पाटणा : बिहारमध्ये सर्वात जास्त इथेनॉल प्लांट स्थापन करणे हे आमचे ध्येय आहे. आणि याची शानदार सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन बिहारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केले. पुर्णिया येथे १०५ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह उभारलेल्या नव्या इथेनॉल प्लांटमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे त्यांनी सांगितले.
मंत्री सैयद शाहनवाज हुसेन म्हणाले की, आम्ही उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक खिडकी योजना लागू करण्यासह निकषांमध्ये सुधारणा केली आहे. पुढील एक ते दोन वर्षांत आम्हाला इथेनॉलसह अन्य डझनभर औद्योगिक युनिट येथे येतील अशी अपेक्षा आहे.
मंत्री हुसेन यांनी सांगितले की, पुर्णियामध्ये आधी धान्यावर आधारित ग्रीनफिल्ड इथेनॉल प्लांट सुरू झाला आहे. ते म्हणाले की, ज्या १५ एकर जागेवर आम्ही हा प्लांट स्थापन केला आहे, तेथे यापूर्वी विटभट्टी होती. ईस्टर्न इंडिया बायोफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (ईआयबीपीएल) प्रमोटर्सपैकी एक असलेल्या विशेष कुमार वर्मा यांनी सांगितले की, मक्का आणि खराब तांदूळ घेऊन शेतकरी आमच्याकडे येऊ लागले आहेत. या प्लांटसाठी प्रती दिन १७० टन मक्का आणि तांदळाची गरज आहे. ३० एप्रिल रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे. वर्मा यांनी सांगितले की, बिहार आणि शेजारील पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना इथेनॉल विक्री केली जाणार आहे. यासाठी दहा वर्षे मुदतीचा करार करण्यात आला आहे, असे वर्मा म्हणाले.