नगर : ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदा साखर कारखान्याला कमी ऊस उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होऊन कमी साखर उत्पादन, उपपदार्थ निर्मितीला फटका बसला आहे. आतापर्यंत नऊ कारखान्यांचे धुराडे बंद झाले असून, पाच कारखान्यांचे गाळप सुरू आहे. हे कारखाने बाहेरच्या जिल्ह्यातून ऊस आणून गाळप करीत आहेत. येत्या आठवडाभरात हे कारखाने बंद होतील, अशी माहिती नगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.
यंदा खासगी व सहकारी अशा १६ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता. हे सर्व साखर कारखाने सुरू झाले होते. परंतु ऊसाअभावी फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान साखर कारखान्यांचे गाळप थांबले आहे.
जिल्ह्यातील संजीवनी, शंकरराव काळे, अशोक, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, मुळा, क्रांती शुगर, गंगामाई, केदारेश्वर हे नऊ कारखाने बंद झाले आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत पाच कारखाने बंद झाले होते. त्यानंतर चार कारखाने बंद झाले आहेत. सध्या प्रवरा, थोरात, अगस्ती हे तीन सहकारी व अंबालिका हा खासगी अशा चार कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या चार कारखान्यांचे साखर उत्पादन जास्त झाले आहे. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. नगर जिल्ह्याला लागून असलेल्या सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव या भागातील साखर कारखाने लवकर बंद झाले आहे.
या भागात ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे गाळप सुरू असलेल्या कारखान्यांनी आपल्या ऊस तोडणी टोळ्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये पाठविल्य़ा असून, त्या ठिकाणांहूनही गाळपासाठी ऊस आणला जात आहे. त्यामुळे हे साखर कारखाने आठवडाभर सुरू राहणार आहे. या कारखान्यांचे साखर उत्पादनाबरोबर उपपदार्थ निर्मितीचे मोठे प्रकल्प आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न या कारखान्य़ांचा आहे.
५ मार्च २०२० पर्यंत अहमदनगर विभागात 54.१8 लाख मे.टन.उसाचे गाळप झाले तर १०.२8 रिकव्हरी सह एकूण 55.71 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तेच राज्यात बोलल्यास 32 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. त्यापैकी औरंगाबाद, 8 अहमदनगर, 4 सोलापूर, 4 पुणे, 2 अमरावती आणि 3 कोल्हापूर येथील साखर कारखान्यांचा सहभाग आहेत. राज्यामध्ये सध्या 477.77 लाख टन ऊसाचे गाळप केले असून ११.०८ रिकव्हरी सह 529.40 लाख क्विंटल म्हणजेच,सुमारे 52.94 लाख टन साखर उत्पादन केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.