बिजनौर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा सुरू असून भारनियमनही केले जात आहे. पाऊस झाला नसल्याने तसेच पाण्याअभावी कुपनलिका चालविणे शक्य होत नसल्याने ऊसाला पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे उसावर टॉप बोरर, पोक्का बोईंग रोगाची लक्षणे दिसत आहेत. जर पाऊस झाला तर उसावरील या रोगांचा प्रदुर्भाव कमी होईल असे शेतकरी बबलू, नीरज सिंह, चरण सिंह आदींनी सांगितले. मात्र जर पावसाला उशीर झाला तर पिक नष्ट होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
याबाबत जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, मंडावली विभागातील जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पूर्वहंगामी प्रजातीच्या उसाची लागण केली आहे. या प्रजातींवर रोगाचा फैलाव अधिक झालेला दिसतो. शेतकरी रविंद्र सिंह, ओंकार सिंह आदींनी सांगितले की, या प्रजातीच्या उसापासून फायदा अधिक मिळतो. सुनील त्यागी, नरेंद्र सिंह आदी शेतकऱ्यांनी
सांगितले की, उसावरील टॉप बोरर, पोक्का बोईंग आदी रोगांमुळे ऊसाची रोपे वाळत आहेत. पुरेस पाणी उसाला देता यावे यासाठी सरकारने उच्च दाबाने विज द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.