गोहाना, हरियाणा: आहूलाना साखर कारखान्यात उसाची आवक कमी झाली आहे. कृषी विधेयकांना विरोध करून शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे अपेक्षेपेक्षा कमी शेतकरी ऊस घेऊन कारखान्याकडे येत आहेत. त्यामुळे आता अधिकारी शेतकऱ्यांना मेसेज पाठवून ऊस गाळपासाठी मागवत असल्याचे चित्र आहे.
साखर कारखान्याचा गळीत हंगाम गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाला. व्यवस्थापनाने या हंगामात ४७ लाख क्विंटल ऊस गाळपाचे टार्गेट ठेवले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १८.७५ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. मात्र, आता आंदोलनाला पाठिंबा देत येथील शेतकरीही आंदोलनस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे कारखान्यातील उसाची आवक घटली आहे.
यापूर्वी कारखाना कार्यस्थळाचा परिसर ऊस घेऊन आलेल्या ट्रॉलींनी भरलेला दिसायचा. मात्र, आता यार्डात उसाच्या ट्रॉली कमी दिसत आहेत. केन मॅनेजर मनजीत दहिया यांनी सांगितले की, अपेक्षेपेक्षा कमी शेतकरी ऊस घेऊन येत आहेत. त्यामुळे गाळप क्षमतेच्या आधारे शेतकऱ्यांना एसएमएस करून ऊस मागवला जात आहे. कारखान्याला गाळपास उसाची कमतरता भासू नये याची काळजी घेतली जात आहे.