जालना : अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील यांना साखर आणि इथेनॉल उद्योगासाठी उत्कृष्ट प्रतिभा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. साखर आणि इथेनॉल उद्योगासाठीचे देशातील आघाडीचे ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म ‘चिनीमंडी’द्वारे नवी दिल्ली येथे आयोजीत ‘शाश्वतता जागतीक साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दिलीप पाटील यांना साखर आणि इथेनॉल उद्योगासाठी ‘उत्कृष्ट प्रतिभा’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रख्यात अभिनेत्री भाग्यश्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
दिलीप पाटील हे २०१८ पासून कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात कारखान्यात विविध योजना राबवून कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्यकाळात तीन इथेनॉल प्रकल्पाची उभारणी झाली असून कारखान्याचे विस्तारीकरण झाले आहे. कारखान्याने देश व राज्य पातळीवरील विविध पारितोषिकेही मिळवली आहेत. कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री, आमदार राजेश टोपे, कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार यांसह संचालक मंडळाने पाटील यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.