नेपाळमधील भेरी गंगा नगरपालिका ५ नजिकच्या बाबई – सुरखेत पोलीस चौकीत कर चुकवेगिरी करून तस्करी केली जाणारी साखर जप्त करण्यात आली. मोठ्या प्रमाणात ही साखर तस्करी सुरू होती. कैलाईहून सुरखेतकडे जाणाऱ्या ट्रकमधून (Bhe १ Kha ३०४१) साखरेची अवैध वाहतूक केली जात होती.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, तपासणीदरम्यान, सीमा शुल्क चुकवून भारतामधून आयात केली जाणारी साखर पोलिसांना आढळली. पोलिसांनी लम्की चुहा नगरपालिका २, कैलाली येथील नेत्र बहादूर शाही (वय ४३) आणि ३४० पोती (१७ टन) साखरेसह ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे व्हॅट बिल व ऑनलाईन बिल सापडले. मात्र, सीमा शुल्क विभागाशी संबंधीत आवश्यक कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत.
प्रत्येक पोत्यामध्ये ५० किलो साखर होती. कर्नाली विभागाचे पोलीस कार्यालय सुरखेतमधून सांगण्यात आले की, जप्त केलेली साखर नेपाळगंज सीमा शुल्क कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे. सुरखेतमधून कर्नालीच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध साखर पुरवठा केला जात होता. पोलिसांकडून तपासणी केली जात नसल्याने सुरखेतमधून डोंगराळ जिल्ह्यांमध्ये कोणत्याही तपासणीविना मालाची अवैध वाहतूक केली जात आहे.