कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करताना नियम धाब्यावर बसवले जातात. केवळ कागदोपत्री तपासणी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. एका कारखान्यात चार ते पाच वजन काटे असतात. हे वजन काटे अवघ्या दोन ते अडीच तासांत तपासणी केल्याचे अहवाल वैधमापनशास्त्र विभागाकडे आहेत. शेतकऱ्यांना एक टनामागे १०० ते २०० रुपयांपेक्षा अधिक रकमेचा फटका बसत आहे. साखर सहसंचालकांनी याची दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
‘पुढारी’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याबाबत शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, कारखान्यांमध्ये जेवढ्या वजनाचे क्षमतेचे काटे आहेत, त्यापैकी १० टक्के वजने ही बिडाची असावी लागतात. ६० टनांचा वजन काटा असेल तर बिडाची वजने ६ टन लागतात. एक वजनकाटा तपासणीसाठी ६ टनांची वजने ठेवावी लागतात. यासाठी क्रेनचा वापर केला जातो. वजन काट्याची वायरिंग तपासणीला वेळ लागतो. मग कारखान्यातील चार वजन काट्यांची दोन तासात तपासणी केली, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. वजन काट्यावर उसाच्या वजनाची नोंद इंडिकेटरवर होते. त्याच इंडिकेटरमधून शेतकऱ्याला त्याच्या वजनाची पावती मिळणे आवश्यक आहे. पण तसे होत नाही. या ठिकाणीही वजन काट्यात फेरफार केला जात असल्याचा संशय आहे.